रत्नागिरी : वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने २ लाख १४ हजारांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी : वर्क फ्रॉम होम जॉबचे आमिष दाखवून सुरुवातीला कामाचा मोबदला देत नंतर फिर्यादीचीच तीन महिलांनी तब्बल २ लाख १४ हजार ३१४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना बुधवार १८ सप्टेंबर ते सोमवार २३ सप्टेंबर रोजी हिंद कॉलनी परिसरात घडली आहे.

ईशाना पटेल, कार्तिका सुरेश, त्रिशा जैन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयित महिलांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात निरंजन सुशांत सावंत (मूळ रा.. जालगाव-दापोली, सध्या रा. हिंद कॉलनी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, १८ सप्टेंबर रोजी फिर्यादीच्या व्हॉट अॅपवर ईशाना पटेल, भारत ब्रडिंग जिनियसयी एक्झिक्युटिव्ह आपल्याकरता वर्क फ्रॉम होम कामाची संधी असा मेसेज आला.

त्यानंतर १८ ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ईशाना पटेल, कार्तिका सुरेश, त्रिशा जैन यांनी मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने फिर्यादीला वर्क फ्रॉम होम जॉबचे आमिष दाखवून सुरुवातीला कामाचा मोबदला दिला. त्या नंतर वारंवार वॉटसअॅप व टेलिग्रामच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधून फिर्यादीच्या तसेच त्याची आई व मित्राच्या खात्यातून तब्बल २ लाख १४ हजार ३१४ रुपये भरण्यास लावून फसवणूक केली. या प्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 30/Sep/2024