दापोली : वातावरणातल्या होणाऱ्या बदलांमुळे यावर्षीचा कासव विणीचा हंगाम लांबला आहे. विणीच्या हंगामाला नोव्हेंबरमध्ये सुरवात झाली असून गुहागर वरचापाट येथील समुद्रकिनारी एक घरट संरक्षित करण्यात आले आहे. त्यानंतर म्हणजे डिसेंबरमध्ये तयार झालेली घरटी धरून जिल्ह्यात कासवांच्या अंडयांची एकूण सात घरटी संरक्षित केली आहेत, अशी माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे कांदळवन विभागाचे अधिकारी किरण ठाकूर यांनी दिली.
यावर्षी पावसाचा हंगाम थोडा लांबल्याने अंडीचा हंगाम नोव्हेंबरमध्ये थोडा उशिराच सुरू झाला. वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे विणीचा हंगाम लांबला, तरीही नोव्हेंबरमध्ये गुहागर येथील वरचापाट येथील किनारपट्टीवर कासवाचे एक घरटे संरक्षित करण्यात आले. त्यानंतर डिसेंबरमध्ये अजून सहा ठिकाणी कासवाच्या अंड्याची घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. गुहागरमधील तवसाळ, गणपतीपुळे व राजापूर तालुक्यातील वेत्ये येथे प्रत्येकी एक घरटे संरक्षित करण्यात आले आहे.

दापोली तालुक्यामध्ये आंजर्ले आणि दाभोळ या ठिकाणी एक घरटे संरक्षित करण्यात आले आहे. साधारण ४५ ते ५५ दिवसांनी ही पिले बाहेर येतील, तेव्हा कासवमित्र त्यांना समुद्रात सोडतील, असे ठाकूर यांनी सांगितले.
आंजर्लेत ११८ अडी
या हंगामातील आंजर्ले समुद्रकिनारी येथे पहिलेच कासवाचे घरटे झाले असून कासवाच्या मादीने तब्बल ११८ अंडी दिली आहेत. ही अंडी आंजर्ले येथील कासवप्रेमी प्रथमेश केळसकर, अजिंक्य केळसकर, सुजन खेडेकर यांच्या मदतीने वनविभागाने संरक्षित केली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 01/Jan/2025













