दापोलीत वाळू वाहतुकीच्या ४ डंपरवर कारवाई

दापोली : पालगडचे मंडळ अधिकारी व त्यांच्या पथकाने मंडणगड, खेड व पालगड दापोली या मार्गावर विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ४ डंपरवर कारवाई केली. त्यांना सुमारे ६ लाख २५ हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.

पालगडचे मंडळ अधिकारी सयाजी पवार व त्यांच्या पथकाने म्हाप्रळ येथून वाळू घेऊन खेडकडे व दापोलीकडे जाणारे ४ डंपर पकडले. त्यातील ३ डंपर पालगड जवळ असलेल्या शिरखल येथे, तर चौथा डंपर पिसई येथे थांबविण्यात आला. डंपर चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता तो नसल्याने हे चारही डंपर दापोली तहसील कार्यालयाच्या आवारात आणून उभे करण्यात आले.

डंपर मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी एका डंपरमध्ये पाऊण ब्रास तर उर्वरित तीन डंपरमध्ये प्रत्येकी सव्वा ब्रास वाळू आढळून आली. प्रती ब्रास ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला असून प्रती डंपर एक लाख रुपये दंड असा एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचा दंड या डंपर मालकांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 01/Jan/2025