दापोलीतील कळंबट रस्त्याची दुरवस्था

दापोली : दापोली तालुक्यातील कळंबट रस्त्याची सध्या दुरवस्था झाली असून वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. तालुक्यातील सारंग पंचक्रोशीतील गावांसाठी हा रस्ता महत्वपूर्ण आहे. सारंग, कळंबट म्हैसोंडे, वाघवे, अडखळ या गावांसाठी दापोली शहरात येण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

अशा मार्गावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. डोंगर रांगेच्या उताराला लागूनच रस्ता जात असल्याने डोंगरातून झिरपणारे पाणी हे रस्त्यात पडलेल्या खड्यांमध्ये तुंबून राहत आहे. रस्त्यातील खड्यात तुंबलेल्या गढूळ पाण्यामुळे रस्त्यातील खड्यांच्या खोलीचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने अनेकवेळा अपघात होतात.

रस्ता अरुंद असल्याने आणि या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ पाहता रस्त्याची तातडीने सुधारणा होणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी ग्रामस्थांसह वाहनचालकांमधून मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 01/Jan/2025