रत्नागिरी : मनसे तालुकाध्यक्षांना मारहाण प्रकरण: आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल

रत्नागिरी : मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांना बेदम मारहाण करणाऱ्या आरोपीं विरुद्ध न्यायालयात आरोप पत्र दाखल झाले आहे. या गुन्ह्यात मनसेच्याच पदाधिकाऱ्यांसह सहा आरोपींचा समावेश आहे. मनसेच्याच पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर्गत चढाओढीतून आपल्याच पक्षाच्या नेत्याला मारहाण करण्याची ही विरळ घटना आहे.

मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांना ३ सप्टेंबर रोजी लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण झाली होती. तालुकाध्यक्ष रुपेश जाधव गोडबोले स्टॉप येथील आपल्या शो रुममधून बाहेर पडल्यानंतर पाठीमागून हल्ला झाला होता. याप्रकरणी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी याच्यासह रुपेश चव्हाण, राहुल खेडेकर, आशिष कट्टीमण्णी, सचिन शिंदे, सिकंदर शेख या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणी तपास करुन आरोपींविरुद्ध न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात आरोपींना न्यायालयात हजर राहण्यासाठी १० जानेवारी रोजी न्यायालय पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्याची शक्यता आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीच मनसेच्या नेत्याला मारहाण करण्याची रत्नागिरीतील ही पहिलीच घटना आहे. तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या पायाला या हल्यात जबर दुखापती झाल्या होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 01/Jan/2025