राजापूर : कोंढेतड येथील क्रिकेट स्पर्धेमध्ये महालक्ष्मी उपळे संघ विजयी

राजापूर : राजापूर शहरानजीकच्या कोंढेतड धोपटेवाडी येथील शिवप्रेमी क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय गाव मर्यादित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये आयसीसी पन्हळे संघाचा पराभव करीत महालक्ष्मी उपळे संघाने विजेतेपद पटकावले. दुर्गादेवी विल्ये आणि शिवप्रेमी कोंढेतड यांनी अ नुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकावला.

सर्व विजेत्या संघांना मान्यवरांच्याहस्ते आकर्षक चषक आणि रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाला माजी उपसरपंच अरविंद लांजेकर, माजी उपसरपंच सुभाष नवाळे, व्यावसायिक ललित कदम, पवार, धोपटेवाडी प्रमुख वसंत धोपटे यांसह शिवप्रेमी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, क्रिक्रेटपटू उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये तालुक्यातील ३५ संघांनी भाग घेतला होता. त्यामध्ये आयसीसी पन्हळे विरूद्ध महालक्ष्मी उपळे या दोन संघा दरम्यान स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. त्यामध्ये आयसीसी पन्हळे संघाचा पराभव करीत महालक्ष्मी उपळे संघाने विजेतेपद पटकावले.

विजेत्या संघाला रोख २५ हजार ५५५ रूपये, उपविजेत्या संघाला १५ हजार ५५५ रूपये, तृतीय क्रमांक विजेत्याला ३ हजार ३३३ रूपये आणि चतुर्थ क्रमांक विजेत्याला २ हजार २२२ रूपये आणि आकर्षक चषक देवून मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिवप्रेमी क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 01/Jan/2025