संगमेश्वर : संगमेश्वर शहर परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, बिबट्याचे प्रत्यक्षात काहींना दर्शन झाल्याची चर्चासुद्धा सुरू आहे. या बिबट्याची भटकंती संभाजीनगरपर्यंत सुरू असून जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याने येथील दादू कुष्टे यांच्या पाळीव कुत्र्यावर झडप मारली. यामध्ये कुत्रा जखमी झाला आहे.
मुक्या जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याची भक्ष्यशोधार्थ भटकंती शहरी भागासह लोकवस्तीच्या ठिकाणी सुरू असून, शहरातील वाढलेल्या श्वानांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते बिबट्याचे शिकार झाले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
काही वाहनचालकांना शहरातील अंतर्गत रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होत असून, वाहनचालकांमध्ये दहशत बसली आहे. त्यामुळे रात्रीची वर्दळ रोडावली आहे.
दोन दिवसांपूर्वी संभाजीनगर येथील कुष्टे यांच्या घराजवळ साखळीने बांधून ठेवलेल्या कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्याने त्याच्यावर झडप घातली; मात्र या तावडीतून कुत्र्याने आपली सुटका करून घेतली. बिबट्याच्या तावडीतून सुटण्याच्या धडपडीत कुत्र्याच्या जीवावरचे जखमेवर निभावले, महामार्गाच्या एका बाजूला संगमेश्वर शहर तर दुसऱ्या बाजूला टेकडीवर संभाजीनगर ही लोकवस्ती असून, राष्ट्रीय महामार्ग ओलांडून बिबट्याचा वावर दोन्ही ठिकाणी असावा, असा अंदाज आहे. वनविभागाने यामध्ये लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:05 PM 01/Jan/2025













