गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील सन २०२५ या नववर्षाची सुरुवात लाखो भाविकांनी स्वयंभू श्रींच्या देवदर्शनाने केली यावेळी गणपतीपुळे देखील स्वयंभू श्रीच्या मंदिरात विविध ठिकाणांहून आलेल्या भाविक व पर्यटकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली होती. या देवदर्शनामध्ये भाविकांनी नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या प्रकारे होण्यासाठी आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी तसेच सुखी, समाधानाचे जीवन जगण्यासाठी स्वयंभू श्रीच्या चरणी मनोभाव प्रार्थना केली.
गणपतीपुळे येथील तीर्थक्षेत्रात शनिवार व रविवारपासून लाखो भाविक व पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सन २०२५ च्या नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी दाखल झाले होते, या पाश्र्वभूमीवर बुधवार दि. १ जानेवारी २०२५ च्या पहिल्याच दिवशी भाविकांनी स्वयंभू श्रींच्या मंदिरात देवदर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

यावेळी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील देवस्थान समितीनेही भाविकांची गर्दी लक्षात घेवून दर्शन चोख व्यवस्था ठेवली होती. तसेच दर्शन रांगांच्या ठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून अतिशय शिस्तबद्धपणे भाविकांना नववर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनानी संधी उपलब्ध करून दिली.
यावेळी आपल्या सर्वच भाविकांनी देवस्थान समितीच्या व्यवस्थापनाचे खास कौतुक करून समाधान व्यक्त केले.
दरम्यान, एकूणच गणपतीपुळे येथे नववर्षाच्या प्रारंभीपासूनच भाविकांचा ओघ सुरू राहणार असून, येथील पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येणार आहेत. त्यामुळे स्थानिक सर्वच लहान-मोठ्या पर्यटन व्यासायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 02/Jan/2025














