दापोली : अल्पवयीन मुलीला शीतपेयामधून गुंगीचे औषध देत अत्याचार करणाऱ्यास अटक

दापोली : सोशल मीडियाद्वारे ओळख निर्माण करत एकाने अल्पवयीन मुलीला शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले. तिचे फोटो काढून ते समाजमाध्यमावर टाकण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार करणाऱ्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित अझहर कडवळकर याने जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीशी समाजमाध्यमाद्वारे ओळख करून घेऊन मैत्री केली. तो एप्रिल २०२२ मध्ये पीडितेला एका फार्महाउसवर घेऊन गेला व तेथे तिला शीतपेय पिण्यास दिले. ते प्यायल्यानंतर या मुलीला गरगरू लागले. त्याचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केले व त्याचे फोटोही काढले. त्यानंतर त्याने हे फोटो समाजमाध्यमावर टाकेन, अशी धमकी देऊन तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. समाजमाध्यमावर ओळख झाली तेव्हा अझहर याने वेगळेच नाव सांगितले होते; त्याने लग्न कर असा तगादा लावला; मात्र पीडितीने नकार दिल्याने त्याने या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर पीडितीने पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्याआधारे संशयित अझहर कडवळकर याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला प्रथम पोलिस कोठडी देण्यात आली व ती संपल्यावर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत. तक्रारीत संशयिताचे नाव अझहर कडवळकर असे दिले होते; मात्र तपासात ते अझहर कडवईकर असे निष्पन्न झाले असल्याची माहिती तपास अधिकारी यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 02/Jan/2025