राजापूर : चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी फाउंडेशन कोर्सला प्रवेश; मात्र, कोरोना महामारीत ऑनलाईन वर्ग, गावात पुरेसा मोबाईल रेंजचा अभाव आणि इंटरनेट नसल्यामुळे अभ्यास करणे कठीण झाले होते. या प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता नियोजनबद्ध अभ्यासावर भर देत तालुक्यातील भालावली येथील गिरीश हळदवणेकर याने पहिल्या प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंटच्या (सीए) परीक्षेत यश मिळवले.
तालुक्यातील भालावली येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेला गिरीश कशेळी येथील बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत असताना वडिलांनी त्याला सीएच्या फाउंडेशन कोर्ससाठी रत्नागिरी येथील पुरूषोत्तम पाध्ये यांच्या उज्ज्वला क्लासमध्ये दाखल केले. या ठिकाणी सीए होण्याची स्वप्नपूर्ती करण्याच्या अनुषंगाने गिरीश याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना सीए दीपाली पाध्ये, सीए शरदचंद्र वझे यांचे मार्गदर्शन लाभले. फाउंडेशन कोर्समध्ये याला चांगले यश मिळवून सीएच्या प्रत्यक्ष कोर्ससाठी गिरीशने प्रवेश घेतला. त्याच दरम्यान, भारतासह जगभरामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले होते. त्या काळामध्ये घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले होते. त्यामुळे गिरीश याने ऑनलाईन पद्धतीने होणारी लेक्चर्समध्ये घरातून सहभाग घेत होता; मात्र, गावामध्ये पुरेशी रेंज आणि इंटरनेट सुविधेअभावी ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करताना त्याला अडचणींचा सामना करावा लागत होता; मात्र, त्यामध्ये त्याने हार न मानता स्वयंअध्ययनावर भर देत तो सीएचा अभ्यास करत होता. नियोजनबद्ध अभ्यासाला मेहनतीची जोड देत गिरीश वयाच्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नामध्ये सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला.
सीए परीक्षेत मिळालेल्या यशात वडील अवधूत, आई अंकिता हळदवणेकर यांच्यासह सारस्वत स्नेहवर्धक मंडळ रत्नागिरी, गौड सारस्वत ब्राह्मण मंडळ, मुंबई येथील सीए अम्रिता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या पाठबळामुळे पहिल्या प्रयत्नात यश मिळवता आले. – गिरीश हळदवणेकर, भालावली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 02/Jan/2025














