चिपळूण : शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी दरवर्षी ज्ञानेश्वरी पठण करण्याची परंपरा जपली जाते; मात्र सलग ५० वर्षे अखंडपणे सामुदायिक ज्ञानेश्वरी पठण करण्याची परंपरा चिपळुणातील वाणीआळी येथील मुरलीधर देवस्थानमध्ये सुरू आहे. येथे दरवर्षी श्रावणात महिनाभर ज्ञानेश्वरी पारायण केले जाते. जुन्या पिढीसह नवी पिढीदेखील यात सहभागी होते. नुकताच या देवस्थानने भक्तिभावाने सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे.
शहरातील वाणीआळी येथील मुरलीधर देवस्थानमध्ये १९७४ मध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात झाली. दरवर्षी श्रवण महिन्यात प्रतिपदा ते अमावस्येदरम्यान पारायण केले जाते. या परंपरेची माहिती देताना मुरलीधर देवस्थानचे कार्यकारी अध्यक्ष संजय रेडीज व सदस्य उपेंद्र गुडेकर म्हणाले, (कै.) पुरुषोत्तम सहस्रबुद्धे यांनी एकोप्याने धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यासाठी सामुदायिक ज्ञानेश्वर पारायणाची संकल्पना मांडली. त्यास वाणीआळीतील तत्कालीन मंडळींनी प्रतिसाद दिला आणि सामुदायिक पारायणाला सुरुवात झाली. लोक धार्मिक कार्यक्रमात व्यस्त असायचे. सामुदायिक पारायणात सुरुवातीला सुमारे २०० लोक सहभागी व्हायचे. त्यांच्यात धार्मिकतेची ओढ जास्त होती. चिंचनाका, खेड, वडनाका, वाणीआळी परिसरातील दादा म्हापुसकर, दादा फडके, आप्पा डाकवे, दादा टाकळे, आप्पा चितळे, आप्पा म्हादलेकर, घाणेकर आदीजण उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायचे. सकाळी ७ ते ८ दरम्यान पारायण घेतले जाते.

१०० ज्ञानेश्वरी ग्रंथांची सुविधा
येथे ज्ञानेश्वरी पठण करण्यासाठी स्वतःला ग्रंथ आणावे लागत नाहीत. मंदिरात १०० ज्ञानेश्वरी ग्रंथांची आणि व्यासपीठाची सुविधा आहे. महिनाभर चालणाऱ्या या पारायण सोहळ्यात सुरुवातीला तरुणाईचा ओघ जास्त होता. कालांतराने तो कमी होत गेला. ५० वर्षापासून सुरू असलेल्या या सोहळ्यात अलीकडच्या काळात ५० ते ६० जण सहभागी होत असतात. मुरलीधर देवस्थानमध्ये १९७४ मध्ये सुरू झालेले ज्ञानेश्वरी पठण आजही सुरू आहे.
वाणीआळीतील मुरलीधर मंदिरात ५० वर्षांपूर्वी सुरू झालेले ज्ञानेश्वरी पठण अखंडपणे सुरू आहे. देवस्थान ज्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमातून संस्कृतीचे जतन केले जाते. – संजय रेडीज, कार्यकारी अध्यक्ष, मुरलीधर देवस्थान
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 02/Jan/2025













