पावस येथून मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी

पावस, ता. २ तालुक्यातील पावस-गोडबोलेवाडी येथील खासगी कंपनीच्या टॉवरच्या ७९ हजार ५०० रुपयांच्या बॅटऱ्या चोरट्याने चोरून नेल्या. पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली. हा प्रकार २८ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुहास दत्ताराम चव्हाण (४४, रा. गव्हाणे, ता. लांजा) हे पावस-गोडबोलेवाडी येथे इंडस कंपनीचा टॉवरच्या देखरेखीचे काम करतात. त्या टॉवरच्या तळाला पत्र्याची बंदिस्त केबिन आहे. टॉवरजवळ बॅटऱ्या ठेवलेल्या होत्या. त्या बॅटऱ्या चोरट्याने पळवल्या. चोरट्याने पत्र्याच्या केबिनचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या प्रकरणी सुहास चव्हाण यांनी पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.