दापोली : अल्पवयीन मुलेचे लैगिक शोषण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

दापोली : तालुक्यातील अल्पवयीन मुलीची समाजमाध्यमाद्वारे ओळख करून घेत तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन शोषण केल्याप्रकरणी चिपळूण येथील संशयित अजहर कडवळकर याच्यावर दापोली पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम पोलीस कोठडी देण्यात आली व ती संपल्यावर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका अल्पवनीय मुलीशी समाजमाध्यमाद्वारे ओळख करून घेत चिपळूण येथील संशयित कडवळकर
हा मुलीला एप्रिल २०२२मध्ये चिपळूण येथील एका फार्महाऊसवर घेऊन गेला व तेथे तिला थंडपेय पिण्यास दिले. ते प्यायल्यानंतर मुलीला गरगरू लागले. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने या मुलीवर अत्याचार केले व तिची छायाचित्र काढली. त्यानंतर अझहर याने या मुलीला ही छायाचित्रे समाजमाध्यमावर टाकेन अशी धमकी देऊन तिच्यावर गुहागर व मुरुड येथे अतिप्रसंग केला.
समाजमाध्यमावर ओळख झाली तेव्हा अझहर याने वेगळेच नाव सांगितले होते. मात्र या मुलीला त्याचे खरे नाव समजताच तिने त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला. तेव्हा अजहर याने त्याच्याशी लग्न कर असा तगादा लावला. मात्र या मुलीने त्यासाठी नकार दिल्याने त्याने त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर या मुलीने दापोली पोलीस ठाण्यात अझहर विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे संशयित कडवळकर याच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात पोस्को अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत.