चिपळूण : मुस्लिम समाजाला मिळणार घरकुल योजनेचा लाभ

सावर्डे : अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील खुल्या प्रवर्गातील घटकांना घरकुल योजनेत प्राधान्याने सहभागी करून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ग्रामपंचायत स्तरावर शासनाने तसे प्रस्ताव मागितले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून शेकासन यांनी अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील खुल्या प्रवर्गातील घटकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी केली होती. त्याची तातडीने दखल घेऊन ही मागणी पूर्णत्वास नेल्याबद्दल शेकासन यांनी समाधान व्यक्त केले. राज्यात रमाई आवास आणि मोदी आवास अशा दोन घरकुल योजना सुरू आहेत. रमाई आवास या योजनेतून अनुसूचित वर्गासाठी आणि मोदी आवास योजनेतून इतर मागासवर्गीय घटकातील लोकांना प्राधान्य देण्यात येत होते; परंतु अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील खुल्या प्रवर्गातील लोकांना याचा कोणताच लाभ मिळत नसल्याने हा समाज घरकुल योजनेपासून वंचित राहत होता.

अल्पसंख्यांक, मुस्लिम समाजातील खुल्या प्रवर्गातील लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी रमाई आवास आणि मोदी आवासाप्रमाणे अल्पसंख्यांक मुस्लिम समाजालाही या घरकुल योजनेत प्राधान्य मिळावे, अशी मागणी शेकासन यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे ऑगस्टमध्ये निवेदनाद्वारे केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 03/Jan/2025