दापोलीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

दापोली : तालुक्यातील शिवाजीनगर साखळोली येथील कामतकोंड येथे मंगळवारी पहाटे बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करत त्याला ठार केले. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कामतकोंड येथील घडवलेवाडीतील गणेश भुवड हे सकाळी ७.३० वा. गायीचे दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना गोठ्याच्या बाहेर २ वर्षाचे वासरू मृतावस्थेत आढळले.

भुवड यांच्या घराच्या मागील बाजूस गुरांचा गोठा असून या गोठ्यात एक गाय, एक बैल, दोन पाडी अशी चार जनावरे बांधलेली होती. मनुष्यवस्तीला लागूनच हा गोठा आहे. त्यामुळे गावात येथून बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या वाडीत बिबट्याने हल्ला केल्याची ही पहिलीच घटना आहे. गोठ्याच्या मागे घनदाट जंगल आहे. वनरक्षक शुभांगी भिलारे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:51 PM 03/Jan/2025