देवरुख : शहरातील स्व. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि कलाप्रेमी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कलाशिक्षक सुरज मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध चित्र व इतर कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. प्रदर्शनामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये वर्षभरात काढलेली विविध प्रकारची चित्र व इतर कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये निसर्ग चित्र, व्यक्ती चित्र (पोट्रेट), संकल्प चित्र, कोलाज, व्यंगचित्र, भीत्तीचित्र, विविध डिझाइन्स, सुलेखन (कॅलिग्राफी) इत्यादीचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी वॉटर कलर, अॅक्रेलिक कलर, ऑईल कलर, ऑईल पेस्टल, रंगीत पेन्सिल व पेन, चारकोल इत्यादी माध्यमांचा सुयोग्य वापर केला होता. इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या वयोगटातील मुलांनी ही चित्र रेखाटले.
या चित्रांमध्ये मुलांनी विविध विषय हाताळले होते. यातून मुलांची मेहनत, प्रगल्भता, बुद्धिमत्ता आणि प्रतिभा दिसत असल्याची प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली. प्रदर्शनस्थळी शिक्षिका भक्ती मांगले यांनी रेखाटलेली भली मोठी आकर्षक रांगोळी लक्षवेधी ठरली. चित्रकृतींचा नियमित अभिनव उपक्रम राबवून मुलांच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल पालकांनी मुख्याध्यापिका सोनाली नारकर व दीक्षा खंडागळे यांचे अभिनंदन केले.
या कला प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशालेच्या चेअरमन अॅड. वेदा प्रभुदेसाई यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुधीर गावडे, नितीन शेडगे, पल्लवी आपटे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि मार्गदर्शक कलाशिक्षक सूरज मोहिते उपस्थित होते. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी कलाशिक्षक व सहभागी विद्यार्थी कलाकारांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 04/Jan/2025














