साडवली : संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावात सह्याद्रीच्या शिखरात वसलेले मार्लेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र, असे असले तरी या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची झालेली बिकट अवस्था येथे येणाऱ्या भाविकांसाठी व तसेच येथील ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

काही दिवसांनी मकरसंक्रांत सण येत आहे. या तीर्थक्षेत्री मकरसंक्रांत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्साहातील मार्लेश्वर गिरीजा देवीचा विवाह सोहळा (कल्याण विधी) पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी गर्दी करत असतात. या कालावधीत दरवर्षी येथील रस्त्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावतो. त्यामुळे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. येथील मुरादपूर ते मार्लेश्वर रस्ता डांबरीकरण काम २०२३ रोजी पूर्ण झाले असून मारळ ते बोंडे दरम्यान मनीष अणेराव यांच्या घरासमोरील काही भाग व मारळ ते मार्लेश्वर दरम्यान असलेल्या ओढ्यावरील भाग असे दोन भाग अद्याप कच्च्या स्वरूपाचे आहेत. येणाऱ्या मार्लेश्वर यात्रे उत्सवापूर्वी हि कामे पूर्ण करण्यात यावी व तशा सूचना संबंधित ठेकेदारास कराव्यात, अशी मागणी येथील ग्रामपंचायतकडून देवरुख सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाकडे केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 04/Jan/2025














