रत्नागिरी : जिल्ह्यातील सागरी सुरक्षा रक्षक गेले चार महिने विना वेतन काम करत आहेत. चार महिन्याचे वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रखडलेल्या मानधनाचे अनुदान मिळवण्यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव शासनस्तरावर पत्रव्यवहार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे १६७ कि.मी. इतका किनारपट्टीचा भाग लाभला आहे. यामध्ये काही संवेदनशील ठिकाणांचा देखील समावेश आहे. तर ४३ मासळी उतरण्याची केंद्रे आहेत. मात्र, या किनारपट्टीवरील सुरक्षेची जबाबदारी असलेले सुरक्षा रक्षक गेले चार महिने मानधना विना काम करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याबाबतीत वृत्तपत्रांमधून अनेकवेळा वृत्ते प्रसिद्ध झाले आहेत, मात्र शासनस्तरावर अद्यापही यावर ठोस उपाययोजना होत नसल्याकारणाने सुरक्षारक्षकांचे मानधन नेहमीच उशिराने होत आहे. कधी चार महिने तर कधी सहा महिने अशा कालावधीमध्ये सुरक्षारक्षकांचे मानधन जमा होत असल्याकारणाने ते मेटाकुटीस आले आहेत. जिल्ह्यात किनारी भागालगत अवैध मासेमारी, परराज्यातील नौकांचे अतिक्रमण, पर्ससीन मासेमारी यांसारख्या गोष्टीवर नियंत्रण राखण्याचे काम या सुरक्षारक्षकांना करावे लागते. ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता सागरी सुरक्षारक्षक आपले कर्तव्य चोख बजावत असतात. मात्र शासनाला याची जाणीव नसल्याचे सागरी सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात आले.
नव्या मत्स्योद्योग मंत्र्यांकडून अपेक्षा…
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटपामध्ये कोकणातील आमदार नितेश राणे यांच्याकडे मत्स्योद्योग व बंदरे ही महत्त्वाची स्थानिक प्रश्रांच्या निगडित असलेली खाते मिळाल्यामुळे नवे मत्स्योद्योगमंत्री सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहतील, असा विश्वास सागरी सुरक्षारक्षक व्यक्त करत आहेत.
मत्स्योद्योग आयुक्त प्रदीप पी यांना प्रश्नांची जाण
रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्षे काम केलेले प्रदीप पी. यांची नुकतीच शासनाने मत्स्योद्योग आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काम केल्यामुळे नव्या आयुक्तांना येथील स्थानिक प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे नव्या मत्स्योद्योग मंत्री व नव्या मत्स्योद्योग आयुक्तांमुळे सुरक्षा रक्षकांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 04/Jan/2025














