रत्नागिरी : बोलेरो गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक देत अपघात करत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची ही घटना २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास पावस ते रत्नागिरी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घडली होती. विनायक जाधव (३२, रा. कुर्धे, पावस, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मृत दुचाकी चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक अल्पेश विशे यांनी तक्रार दिली. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी विनायक जाधव आपल्या ताब्यातील दुचाकी घेउन रत्नागिरी ते पावस असा जात होता. त्याच सुमारास या अपघातातील जखमी जुबेर मकबुल मजगावकर (३६) त्याची पत्नी फातिमा, मुलगा मोहम्मद आणि मुलगी रुक्काया (सर्व रा. कर्ला, रत्नागिरी) यांना आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८- एझेड-२३३९) वरुन घेऊन भाट्ये ते रत्नागिरी असा येत होता. ही दोन्ही वाहने भाट्ये स्टॉपच्या पुढे आली असता विनायक जाधवने आपल्या पुढील बोलेरो गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला बोलेरोचा वेग आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा आपल्या दुचाकीवरुन तोल गेला आणि त्याने समोरुन येणाऱ्या जुबेरच्या दुचाकीला धडक देत हा अपघात केला.
यात विनायक जाधवचा मृत्यू झाला असून जुबेर आणि त्याचे कुटुंबीय जखमी झाले. या प्रकरणी शुक्रवार ३ जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 06/Jan/2025














