चिपळूण : वाशिष्ठी डेअरीच्या वतीने शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर आयोजित दुसरा कृषी महोत्सव यावर्षी लक्षवेधी ठरणार आहे. या महोत्सवात पशुधन आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत असून 5 ते 9 जानेवारी दरम्यान हा महोत्सव होणार आहे.
यावर्षी खिल्लार बैल राजा, वाशिष्ठीचा राजा सोना रेडा, गजेंद्र रेडा, पंढरपुरी म्हैस, हिंदकेसरी बैल, भारत बैल, बकासुर बैल असे नामवंत पशुधन या कृषी महोत्सवात सहभागी होणार आहेत. शेतकर्यांसाठी कृषी महोत्सव पर्वणीच ठरणार आहे.
गेल्यावर्षी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर यावर्षी शहरातील बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदानात हा कृषी महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात पशुधन, डॉग- कॅट, गोड पदार्थ पाककला, तिखट पाककला अशा स्पर्धा होणार आहेत. तसेच महिला बचत गटांसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचबरोबर शेतीपूरक कृषी विषयक स्टॉल्स असल्याने हा महोत्सव शेतकर्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील मेजवानी असणार आहे.
पशुधन ठरणार लक्षवेधी
या महोत्सवात खिल्लार बैल राजा नाशिक 900 किलो वजनाचा, साडेपाच फूट उंची, राजा कोंबडा (बारामती, सहा किलो वजनाचा), वाशिष्ठीचा राजा सोना रेडा, गजेंद्र रेडा, 300 अंडी देणारी कोंबडी, घोडे, 6 फूट लांबीची पंढरपूरी म्हैस, हिंद व भारत केसरी बकासुर, बलमा, बन्या बैल असे नामवंत बैल सहभागी होणार असल्याने महोत्सव लक्षवेधी ठरणार आहे. या महोत्सवात कोकणी दर्शन व्हावे तसेच नवीन पिढीला शेती विषयक माहिती मिळावी यासाठी या महोत्सवाचे प्रवेशद्वार बांबूपासून बनवण्यात आले आहे. याचबरोबर मचाण, गोठा, झोपडी उभारण्यात आली आहे. हा महोत्सव येथील शेतकर्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 06-01-2025














