रत्नागिरी : नाताळ सुटी आणि नववर्ष स्वागतासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील समुद्रकिनारी असलेल्या पर्यटनस्थळांना प्राधान्य दिले होते. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत लाखो पर्यटकांनी भेट दिली असून त्यामधून १२५ कोटींची उलाढाल झाली. याला खासदार सुनील तटकरे यांनीही दुजोरा दिला आहे. गोव्याकडील पर्यटकांचा राबता हळहळू कोकणाकडे वळू लागल्यामुळे येथील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या तटकरे यांनी सांगितले.
कोकणातील सुमद्रकिनाऱ्यांची भुरळ पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा यांच्यासह बेळगावमधील लोकांनी सर्वाधिक असते. गेल्या काही दिवसांमध्ये गोव्यात ख्रिसमसला प्रचंड गर्दी होत असल्यामुळे पर्याय म्हणून पर्यटकांनी कोकणातील किनाऱ्यांची निवड केली आहे. रत्नागिरीतील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या गणपतीपुळे किनाऱ्यावर मागील आठ दिवसांत सरासरी एक लाखाहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली आहे.
त्यामध्ये २५, २६ या दोन दिवशी तर मागील वर्षभरातील मोठी गर्दी झाल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले. त्यापोठापाठ दापोलीतील हर्णं, मुरूड, गुह्यगर येथील किनाऱ्यांना पसंती मिळाली होती. रायगडमध्ये अलिबागसह आजूबाजूचे किनारे फुल्ल होते. सिंधुदुर्गमध्ये देवगड अधिक पसंती मिळाली. पर्यटकांचा राबता वाढल्यामुळे त्याचा फायदा स्थानिक व्यावसायिकांना झालेला आहे.
याबाबत खासदार सुनील तटकरे म्हणाले, ‘डिसेंबर महिन्यात २५ ते ३१ या कालावधीत किनारी भागातील व्यावसायिकांची १२५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले आणार आहेत. सागरी महामार्गावर ९२ ठिकाणे पर्यटन विकासासाठी निश्चित केली आहेत. त्यामध्ये काळबादेवी येथे होणाऱ्या पुलाचाही समावेश आहे. हे पूल पर्यटनाचे ठिकाण होईल असा आराखडा बनविला जाणार आहे. कोकणात दरवर्षी काही लाख पर्यटक येणार असतील तर, त्यामधून आर्थिक उलाढाल होईल. हे लक्षात घेऊन पर्यटन स्थळांच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे.
जलवाहतुकीचा वर्षभरात रोडमॅप
कोकणात जलवाहतूक सुरू करण्यासाठी पावले उचलली होती. रायगड जिल्ह्यातील काशीदपर्यंत जलवाहतूक सुरू झालेली आहे. त्याचा फायदा निश्चित रोजगार निर्मिताला होणार आहे. त्यासाठी पुढील वर्षात रोडमॅप तयार केला जाणार आहे. तसे नियोजन सुरू केले आहे, असे खासदार तटकरे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 06/Jan/2025














