रत्नागिरी : घुसखोर नौकांवर ड्रोनद्वारे दररोज ६ तास करडी नजर

रत्नागिरी : सागरी सुरक्षा, अनधिकृत व एलईडीद्वारे होणारी मासेमारी आणि परप्रांतीय हायस्पीड नौकांची घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत खोल समुद्रात ड्रोन कॅमेराद्वारे गस्त घालण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी आणि साखरीनाटे ही दोन केंद्र निश्चित केले गेली आहेत. याचे उ‌द्घाटन ९ रोजी होणार आहे. या ड्रोनद्वारे दररोज ६ तास नजर ठेवली जाणार असल्याचे मत्स्य विभागाकडून सांगितले.

शासनाने मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत प्रत्येकी २ तर सिंधुदुर्गत ड्रोन कॅमेरे दिले गेले आहेत. यासाठी पुण्यातील स्नेल कंपनीला कंत्राट दिले आहे. राज्यातील ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर पुर्वी पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जात होती. त्यात कालांतराने यांत्रिकीकरणाची भर पडली. गेल्या काही वर्षांत कोकण किनारपट्टी भागातील जलधी क्षेत्रात परप्रांतिय हायस्पीड बोटींद्वारे घुसखोरी आणि पर्ससीन, एलईडीद्वारे अवैधरीत्या मासेमारीला सुरुवात झाली. त्यामुळे राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी रत्नागिरी आणि साखरीनाटे येथे प्रात्यक्षिकही घेण्यात आली होती. अधिक नौकांची ये-जा असलेल्या बंदरांची निवड ड्रोनसाठी करण्यात आली आहे. याचा आरंभ ९ जानेवारीला मुंबईत मत्य व बंदरमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होईल. त्याचवेळी रत्नागिरी भाट्ये किनाऱ्यावरून ड्रोन सोडून त्याचे उ‌द्घाटन केले जाणार आहे. ड्रोनमुळे पर्ससिननेटद्वारे होणाऱ्या अनधिकृत मासेमारीलाही आळा बसणार आहे. गेल्या काही वर्षात रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारी भागात परप्रांतीय मच्छिमारांचे अतिक्रमण मोठ्याप्रमाणात वाढलेले आहे. त्यांना आळा घालण्यासाठी मत्स्य विभागाकडून गस्ती नौकाही भाड्याने घेण्यात आल्या आहेत. परंतु १२ नॉटीकल मैल अंत्तर असलेल्या समुद्रात एका नौकेद्वारे गस्त घालणे शक्य नाही, त्यामुळे ड्रोनचा उपयोग होणार आहे.

रत्नागिरी आणि साखरीनाटे येथे सर्वाधिक नौका असल्यामुळे या २ बंदरांची निवड केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील कोणत्याही बंदरातून ड्रोन कॅमेरा आकाशात सोडला जाईल. यामुळे सुरक्षेसह अनधिकृत मासेमारील आळा बसणार आहे. – आनंद पालव, प्रभारी सहाय्य मत्स्य आयुक्त, रत्नागिरी

अशी होईल कार्यवाही
रत्नागिरी व साखरीनाटे येथील किनाऱ्यावरून ड्रोन समुद्रात सोडला जाणार आहे. या ड्रोनद्वारे एका दिवसात ६ तास नजर ठेवण्यात येणार असून ड्रोन १०० मीटर उंच आकाशात फिरत राहणार आहे. एवढ्या उंचीवरून १२ नॉटीकल मैल परिसरावर लक्ष ठेवण्याची त्या कॅमेऱ्याची क्षमता आहे. एकावेळी ड्रोन कॅमेरा २ तास उंचीवर फिरत राहू शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 07/Jan/2025