‘चिरेखाण शाळे’त २० मुले गिरवताहेत शिक्षणाचे धडे!

राजापूर : रयत शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाने नावीन्यपूर्ण असलेली ‘चिरेखाण शाळा’ सलग दुसऱ्या वर्षी सुरू केली आहे. या शाळेमध्ये परराज्यातून रोजगारासाठी राजापूर तालुक्यात आलेल्या परप्रांतीय कामगारांची २० मुले शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

सक्तीच्या शिक्षण कायद्यामुळे सर्वांना शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली असली तरी कोकणामध्ये रोजगाराच्या निमित्ताने दाखल होणाऱ्या परप्रांतीय कुटुंबातील शेकडो मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दुरावतात. अशा कुटुंबातील शाळाबाह्य मुलांना मराठे महाविद्यालयाने सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून सुरू केलेल्या नावीन्यपूर्ण असलेल्या चिरेखाण शाळेच्या माध्यमातून शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत. हातिवले-शिंदेवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या या चिरेखाण शाळेचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी उपप्राचार्य डॉ. घनश्याम हराळे, डॉ. अतुल भावे, डॉ. हेमंत अकोलकर, उपक्रमाचे प्रमुख प्रा. प्रकाश कॉडसकर, समन्वयक लक्ष्मण वरक आदी उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ. राठोड यांनी शाळा सुरू करण्याचा उद्देश सांगताना भविष्यामध्ये महाविद्यालयाकडून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. कर्नाटक, बेळगाव, बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यातील कुटुंबे मोठ्या संख्येने कोकणात दरवर्षी रोजगार मिळवण्यासाठी येतात. नेपाळमधील गुरखेही मोठ्या संख्येने आंबा बागांमधील कामे आणि बोटीवर मासेमारीचे काम मिळवण्यासाठी येतात. रोजगाराच्या निमिताने गावोगावी सातत्याने स्थलांतर होत असल्याने या कुटुंबातील मुलांना अनेकवेळा शिक्षण घेता येत नाही.

अशा कुटुंबातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने मराठे महाविद्यालयातर्फे गतवर्षीपासून चिरेखाण शाळा सुरू करण्यात आली. गतवर्षी या शाळेत २४ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले होते. यावर्षीही २० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्थलांतरीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात येण्यासाठी वातावरण निर्मिती करणे, आवश्यकतेनुसार जवळच्या शाळेत विद्यार्थ्यांची पटावर नोंदणी करणे, अंक गणित ज्ञान आणि वाचन, लेखन कौशल्याचा विकास करणे, मनोरंजनातून शिक्षण देणे आणि मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, हे चिरेखाण शाळा सुरू करण्यामागील उद्दिष्ट्ये आहेत.

Hotel waiter

शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करणे, मराठी तसेच हिंदी भाषेतून मुलांशी संवाद साधणे, गाणी वा अन्य उपकमांद्वारे मुलांमध्ये शैक्षणिक अभिरूची निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. मराठे महाविद्यालयाच्या या उपकमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विद्यार्थीच शिकवतात मुलांना
या चिरेखाण शाळेतील विद्यार्थ्यांची आठवड्यातील दोन दिवस किमान दोन तास शिकवणी घेतली जाते. महाविद्यालयातील ‘कमवा आणि शिका’ उपक्रमातील विद्यार्थी या मुलांना शिकवतात. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप केले जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 08/Jan/2025