खेळांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : रायचंद्र गळवे

गुहागर : जीवनात खेळाचे स्थान अनन्यसाधारण आहे. सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करीत असते. विविध खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता, खिलाडी वृत्ती, आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द या गुणांचा विकास होतो. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमधूनच राष्ट्रीय स्तरावरील चांगले खेळाडू निर्माण होतील, असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रायचंद्र गळवे यांनी केले.
जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती गुहागर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना जुगाई सोमजाई क्रीडा नगरी भातगाव येथे सुरुवात झाली. यावेळी उद्घाटक म्हणून गळवे बोलत होते.

यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भातगावचे सरपंच सुशांत मुंडेकर, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे, विस्तार अधिकारी केशव क्षीरसागर, विश्वास खर्डे, केंद्रप्रमुख आरोही शिगवण, परवेज चिपळूणकर, निकम, गायकवाड, महेंद्र रेडेकर, प्रकाश जोगळे, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर आदींसह गुहागर तालुका क्रीडा समिती पदाधिकारी उपस्थित होते. ईशस्तवन व स्वागत गीत कोतळूक नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक महेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले. तसेच भालगाव गोळेवाडी, सडे जांभारी, निगुंडळ त्रिभुवन वाडी या शाळेने क्रीडा नृत्य सादर केले. सरपंच सुशांत मुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून क्रीडा स्पर्धेसाठी सहकार्य करण्यात आले. क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी गुहागर तालुका शिक्षक समन्वय समिती, पंच, क्रीडा समिती तसेच आबलोली बीट येथील शिक्षकांनी केले. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 09/Jan/2025