चिपळूण : सावर्डे एस.टी. स्थानकासाठी आ. शेखर निकम आग्रही

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथे एस.टी. स्थानक व्हावे यासाठी आमदार शेखर निकम आग्रही आहेत. या संदर्भात त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत एमआयडीसीच्या माध्यमातून या एसटी स्थानकासाठी एक कोटी रूपये द्यावेत, अशी मागणी केली.

सावर्डे हे अलिकडच्या काळात एज्युकेशन हब झाले आहे. सह्याद्री शिक्षण संस्था, डॉ. तानाजी चोरगे शिक्षण संस्था, डेरवण येथील वालावलकर ट्रस्ट या संस्थांच्या माध्यमातून या भागात मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. केजी पासून ते पीजी पर्यंत तसेच मेडीकल कॉलेज, नर्सिंग, हॉस्पिटल या सुविधा या ठिकाणी आहेत. त्यामुळे या भागात बांधकाम व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि नागरी वस्तीतही वाढ झाली आहे. दररोज सावर्डेमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करीत असतात. शिवाय चाळीस गावांसाठी सावर्डे हे ठिकाण मध्यवर्ती आहे. त्यामुळे महामार्गालगत असणाऱ्या या गावामध्ये एस.टी. स्थानक व्हावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्या दृष्टीने आ. शेखर निकम यांनी उद्योगमंत्री सामंत यांची भेट घेतली व एमआयडीसीच्या माध्यमातून या स्थानकासाठी एक कोटींचा निधी द्यावा. स्थानकासाठी जागा उपलब्ध आहे असे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत सावर्डेचे उपसरपंच जमीर मुल्ला व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 16/Jan/2025