चिपळूण : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या कार्यकारिणीतून नारळ देण्यात येणार आहे, असे शिवसेना सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण येथे सांगितले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते चिपळूणला आले होते. राऊत म्हणाले, प्रत्येक पक्षात निवडणुकीच्या काळात काही बेईमान लोक निघतात. तसे शिवसेनेतही बेईमान आणि गद्दार लोक होते. इतरांनी टाकलेला तुकडा चाटायचा आणि स्वतःच्या पक्षाशी बेईमानी करणारी औलाद ही प्रत्येक पक्षात होती. त्यामुळे योग्यवेळी त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही करणार आहोत. भास्कर जाधव यांनी काही सूचना केल्या आहेत; मात्र त्याचे फार भांडवल करण्याची गरज नाही. त्यांचा मूळ मुद्दा हा होता की, पक्षाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी निश्चित करून देण्याची आवश्यकता आहे. ती सूचना योग्यच आहे. किंबहुना या सूचनेप्रमाणे पक्षाच्या घटनेत तसा बदल करण्याचे उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतले आहे. त्यामुळे या सूचना केल्या म्हणजे त्यांनी काही वावगे केलेले नाही, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.
शिंदे गटाचे अकांडतांडव
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना हटवण्याचा ठराव शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे. तो ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यावरून माजी राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ज्यांची अक्कल गुडघ्यात असते त्यांना याबाबत काही कळणारच नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे हे नाहीत, त्यामुळे जे नाही त्यावर अकांडतांडव करणारी औलाद शिंदेंच्या गटात आहे, त्यांची ही बकवासगिरी नेहमी चालू असते, त्याला आम्ही जादा किंमत देत नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 16/Jan/2025
