रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुके सावकारीपासून अलिप्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांची संख्या दरवर्षी कमी-जास्त होत असते. जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयात नोंदणी, नुतनीकरणानुसार हे प्रमाण बदलत असले तरी जिल्ह्याच्या मंडणगड, दापोली, गुहागर, लांजा, राजापूर तालुक्यात अजूनही सावकारी रुजलेली नाही. गेल्या आठ वर्षात ४१ परवानाधारक सावकारांमध्ये बाढ झाली आहे. त्याचवेळी सन २०२२-२३ च्या तुलनेत सन २०२३-२४ मध्ये सावकारांची संख्या २ ने कमी झाली आहे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे असलेल्या नोंदीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात २०१७ साली केवळ २८ परवानाधारक सावकार होते. त्यावेळीही मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, लांजा, राजापूरात परवानाधारक सावकाराची नोंद नव्हती.

सन २०२३-२४ मध्येही या तालुक्यांमध्ये सावकारी व्यवसाय अद्याप सुरु झालेला नाही. आठ वर्षांपूर्वी रत्नागिरी तालुक्यात २१ परवानाधारक सावकार होते.

सन २०२२-२३ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात १ परवानाधारक सावकार होते. नुकत्याच संपलेल्या २०२३-२०२४ वर्षात ही संख्या २ ने घटली असून ६९ सावकार राहिले आहेत. रत्नागिरी तालुक्यात २०२२-२३ साली ५६ सावकारांची नोंद होती.

या तालुक्यात आता ही संख्या २ ने घटून ५४ इतकी झाली आहे. चिपळूण तालुक्यात १२ सावकारांची नोंद असून खेडमध्ये २ आणि संगमेश्वरात १ परवानाधारक सावकार आहे. कमी कागदपत्रात आणि कमी वेळात सावकारांकडून कर्ज मिळत असल्याने सध्या या व्यवसायात तेजी आहे.

दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक सावकार असले तरी चिपळूणातील १२ सावकारांकडून रत्नागिरीतील ५४ सावकारांपेक्षा अधिक कर्ज वितरीत झाली आहेत. सन २०२२-२३ मध्ये मात्र रत्नागिरीतील सावकारांकडून सर्वाधिक कर्ज वितरण झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २०१७ साली २८ नोंदणीकृत सावकार होते. त्यामध्ये रत्नागिरीत २१, चिपळूणात ६, आणि संगमेश्वरात १ सावकार कार्यरत होते. मंडणगड, दापोली, गुहागर, लांजा, राजापूरात सावकारांकडून कर्ज घेण्याची संस्कृती अजून सुरु झालेली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:47 PM 21/Jan/2025