रत्नागिरी : थिबा पॅलेसजवळील हरितपट्टयातील झाडांची कत्तल करणाऱ्या विकासकाला ६८ हजार दंडाची नोटीस

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेसजवळील आरक्षित जागा विकास कामे घेतल्यानंतर नगर रचना उपसंचालक कार्यालयाने पार्किंग आरक्षणच रद्द केले. या संदर्भात मनसेने कायदेशीर लढाईची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर या आरक्षित क्षेत्रातील झाडांची कत्तल करणाऱ्या विकासकाला ६८ हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस रत्नागिरी नगरपरिषदेने बजावली आहे.

थिबा पॅलेसजवळील पार्कंग आरक्षित जागा विकासकाने घेतली. या जागेवरची पार्किंग आरक्षण नगररचना उपसंचालक कार्यालयाने उठवले. त्यानंतर ही जागा राजपत्रातील नोंदीनुसार हे पार्किंग आरक्षण रद्द झाल्यानंतर लगतच्या हरित पट्टा आरक्षणात वर्ग होईल, अशी टीप आहे. त्यामुळे हरित पट्ट्यातील ३४ झाडे तोडणे बेकायदेशीर ठरत असल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मनसेच्या आंदोलनानंतर रत्नागिरी नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होऊ लागला होता. परंतू आरक्षण नगर रचना उपसंचालक कार्यालयाने उठविल्याचे समजल्यानंतर आता कायदेशीर लढाईचे नियोजन मनसेकडून केले जात आहे. त्याचवेळी हरित पट्टा आरक्षणात आलेल्या जागेतील ३४ झाडे तोडणाऱ्या विकासकाला ६८ हजार रुपये दंड भरण्याची नोटीस रत्नागिरी नगरपरिषदेने बजावली आहे. प्रत्येकी २ हजार प्रमाणे ३४ झाडांची तोड झाल्याने हा दंड भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 20/Jan/2025