चिपळूण येथे अनुज खरे लिखित ‘साद रानवाटांची’ पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण : महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य अनुज खरे यांनी लिहिलेल्या आणि ओंकार बापट यांनी शब्दांकन केलेल्या ‘साद रानवाटांची’ या पुस्तकाचे प्रकाशन चिपळूण येथे करण्यात आले. त्यानंतर ‘निसर्गायन कथा वनांच्या… बहरल्या मनांच्या’ हा अनोखा कार्यक्रमही सदर करण्यात आला.

‘साद रानवाटांची’ हे पुस्तक ‘सकाळ’ प्रकाशनने प्रकाशित केले असून, या पुस्तकात भारतातील निवडक ५० संरक्षित क्षेत्रांविषयी विस्तृत स्वरूपात माहिती देण्यात आली आहे. यात जंगलांचा इतिहास, या जंगलात कसे जाल, तेथे काय पाहाल, एखाद्या जंगलात दिसणाऱ्या विशिष्ट प्रजातीची माहिती पुस्तकात मांडण्यात आली आहे. या जंगलांमध्ये जाताना निसर्ग पर्यटकांना उपयुक्त असणारे हे पुस्तक आहे.

पुस्तक प्रकाशनानंतर ‘निसर्गायन – कथा वनांच्या… बहरल्या मनांच्या’ हा निसर्गविषयक साहित्याच्या अभिवाचनाचा आगळावेगळा कार्यक्रम झाला. सुप्रसिद्ध निसर्ग साहित्यिकांचे साहित्य अभिवाचन, दृकश्राव्य माध्यमातून सोप्या शब्दांत शास्त्रीय माहिती आणि त्याला सांगीतिक जोड अशी अनोखी गुंफण असलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित निसर्ग रसिकांची दाद मिळवली. डॉ. महेश शिंदीकर, अनिरुद्ध दडके आणि दीप्ती खरे यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाची संहिता ओंकार बापट यांनी लिहिली आहे.

न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी
या पुस्तकाकडे कोणीही केवळ मार्गदर्शक पुस्तक म्हणून पाहू नये. यात सर्व जंगलांची विस्तृत स्वरूपात माहिती दिली आहे, असे प्रतिपादन केले, सुयश टिळक यांनी अशा पुस्तकांचे निसर्ग अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व हे त्यांच्या अनुभवातून अधोरेखित केले तर धनंजय चितळे यांनी अध्यात्म आणि निसर्ग संवर्धन यांची सांगड घालताना संत, ऋषिमुनी यांच्या दूरदृष्टीची उदाहरणे दिली. गिरिजा देसाई यांनी हे पुस्तक केवळ मर्यादित न राहता त्याचा इंग्रजी आणि हिंदीत अनुवाद होणे गरजेचे आहे, असे सांगितले, पुस्तकाचे लेखक अनुज खरे आणि ओंकार बापट यांनी पुस्तकाच्या निर्मितीमागची कथा विशद केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 23/Jan/2025