खेड : पाली भाषा भवन उभारणीचा ठराव संमत

खेड : अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने आयोजित तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगितीची सांगता अनेक महत्त्वपूर्ण ठरावाने करण्यात आली. त्यामध्ये पाली भाषा भवन उभारणीचा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला आहे.

महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे दोनदिवसीय तिसरी सम्यक साहित्य कला संगिती आयोजित करण्यात आली होती. तिचा रविवारी समारोप झाला. समारोप कार्यक्रमात संस्थेच्या वतीने विविध ठराव संमत करण्यात आले.

यावेळी विचारमंचावर प्रबोधिनीचे अध्यक्ष व साहित्यिक ज. वि. पवार, कार्याध्यक्ष व संगितीचे अध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर, सरचिटणीस सुनील हेतकर, संदेश पवार, डॉ. संजय खैरे, डॉ. श्रीधर पवार, दीपक पवार, संजय गमरे आदी उपस्थित होते.

सरचिटणीस संदेश पवार यांनी संगितीच्या निमित्ताने केलेल्या ठरावाचे वाचन केले. त्यास उपस्थित रसिकांनी हात उंचावून मान्यता दिली. यावेळी झालेले ठराव असे पाली भाषा आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल तिसरी सम्यक साहित्य कला संगिती आनंद व्यक्त करते.

मराठीसोबत पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्या भारत सरकारचे ही संगिती आभार मानून अभिनंदन करते.

पाली भाषेच्या संवर्धनाचा संकल्प करून बौद्ध तथा आंबेडकरी साहित्याच्या जपणुकीसाठी पाली भाषा भवन उभारणीचा ही तिसरी सम्यक साहित्य कला संगिती करते तसेच शासनस्तरावरदेखील चवदार तळ्याच्या समता संगराच्या शताब्दीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा प्रकारांचा ठराव करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 24/Jan/2025