संगमेश्वर : अॅग्रीस्टेक प्रणाली अंतर्गत शेतकरी नोंदणीच्या काम संगणक परिचालकांनी करावे, असे महसूल विभागातून सांगण्यात आले होते. पण, हे काम करण्याबाबत परिचालक संघटनेने असमर्थता दर्शवली आहे. संगमेश्वर तालुक्यातील परिचालकांनी तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना तसे लेखी कळवले आहे.
राज्यात सध्या अॅग्रीस्टेक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ह्या प्रणालीअंतर्गत गावागावातून शेतकरी नोंदणी करण्याचे काम शासनाकडून हाती घेण्यात आले आहे. हे काम ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांनी करावे असे सांगण्यात आले होते. गावागावांतून कार्यरत असलेले तलाठी कर्मचारी गावातील संगणक परिचालकांना तशा अर्थाचे फोन करून सांगितले जात होते. पण हे काम करण्यास संगणक परिचालकांनी असमर्थता दर्शविली आहे. या परिचालकांच्या तालुका संघटनेने तहसीलदारांची भेट घेतली आणि तहसीलदार अमृता साबळे यांच्याशी चर्चा केली. या कामासाठी प्रती शेतकरी ‘आयडी’मागे कमिशन देण्याचे सांगण्यात आले आहे; पण यापूर्वीचा अनुभव पाहता अशा कामांचे कमिशन कधीही परिचालकांना मिळालेले नाही. यापूर्वी रेशनकार्ड ऑनलाइन करण्याचे काम परिचालकांनी केले होते. त्यावेळी तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे काम ऑनलाइन करतानाही परिचालकांना कमिशन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, या दोन्ही वेळी त्याची पूर्तता न झाल्यामुळे परिचालकांची फसवणूक झाली होती. त्यामुळे हा पूर्वानुभव लक्षात घेऊन आता हे काम करण्यास परिचालकांनी असमर्थता दर्शविली आहे. तसेच सध्या ग्रामपंचायतींचे १६ व्या वित्त आयोगांतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षांचे आराखडे ऑनलाइन करण्याचे काम संगणक परिचालक युद्धपातळीवर करत आहेत. त्यामुळे सध्या परिचलाक या कामात व्यस्त आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 28/Jan/2025












