दापोली : गेली आठ वर्षे विविध आव्हानांचा सामना करत आपल्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा डौलाने फडकावला आहे. २०१९ ला शिवसेना विरुद्ध सर्व पक्ष आणि २०२४ ला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असूनही मला २५ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. यामध्ये आंजर्ले गावाचाही मोलाचा वाटा आहे, असे मत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत सदस्य मंगेश महाडीक यांच्या नेतृत्वाखाली आंजर्ले कातळकोंड ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार केला. त्या वेळी ते बोलत होते. गृह राज्यमंत्री कदम म्हणाले, आंजर्ले गावामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित होते.
आंजर्ले गावचा पाणी योजना हा ज्वलंत विषय होता. पहिल्या कालखंडात हा प्रश्न सोडवला आहे. आंजर्ले गावामध्ये अनेक विकासकामे झाली आहेत. विकासकामांबरोबरच पुढील काळात रोजगारालाही महत्त्व देण्याची गरज असून, कासवांचे गाव म्हणून आंजर्ले गावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे तसेच कड्यावरील गणपतीमुळे हा परिसर महाराष्ट्रात ओळखला जातो. पुढील काळात आंजर्लेतील किनारपट्टी परिसर असेल किंवा गणपती मंदिर परिसर असेल त्याचे सुशोभीकरण करून पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करून स्थानिकांना रोजगार देण्याचे काम सर्वांच्या सहकायनि करणार आहोत. या वेळी माजी सभापती किशोर देसाई, माजी सभापती प्रकाश कालेकर, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 30/Jan/2025













