रत्नागिरी : शिर्के प्रशालेचा विद्यार्थी निशाद आकुर्डे याला ‘चतुरंग’चा गोडबोले पुरस्कार

रत्नागिरी : अभ्यास, खेळ, वक्तृत्व, लेखन, कला, वर्तणूक आधी गुणांनी युक्त अशा कोकणातील शाळांमधील २०३ अष्टपैलू विद्यार्थ्यांमधून शालेय जीवनात अभ्यासासोबत नियमितता, प्रामाणिकपणा, सामाजिक भान अशी विविध अंगी सर्वोत्तमता सिद्ध करणारा रत्नागिरीच्या रा. भा. शिर्के प्रशालेचा विद्यार्थी निशाद शीतलकुमार आकुर्डे हा चतुरंग प्रतिष्ठानचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार २०२४-२५ चा मानकरी ठरला. अशाच प्रकारे ३४ विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये पुरस्काराचा दिमाखदार सोहळा पार पडला. सिनेअभिनेते दीपक करंजीकरे, झाराप येथील भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर, वैद्यकीय स्वास्थ तज्ज्ञ चिपळूण डॉ. मिलिंद गोखले, रमा करमरकर पोलीस हेडकॉन्स्टेबल, चिपळूण या दिग्गजांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी महोत्सवात पद्म पुरस्काराचे मानकरी हे आजचे पुरस्कार प्राप्त विद्यार्थी नक्कीच असतील, अशी आशा उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

या पुरस्काराबद्दल निशादचे रा.भा. शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका साखळकर, उपमुख्याध्यापक के. डी. कांबळे, पर्यवेक्षिका जाधव, वर्ग शिक्षक ढोले तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निशादचे कौतुक केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 01/Feb/2025