खेड : तालुक्यातील शिरवली नंबर एक शाळेच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी दहा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे नव्याने कामदेखील पूर्ण झाले आहे; मात्र अजूनही विद्यार्थ्यांना नव्या वर्गखोल्यांमध्ये धडे गिरवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सद्यः स्थितीत अंगणवाडीतच विद्यार्थी अध्ययन करत आहेत. एवढा खर्च करूनही नव्या वर्गखोल्यांमध्ये शाळा का भरवली जात नाही, यामागचे कारण अजूनही समोर आलेले नाही.
जुलै महिन्यात शिरवली क्र. एक प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे छत कोसळले होते. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेची छत कोसळल्यानंतर विद्यार्थ्यांचे जीवास धोका लक्षात घेऊन सलग सहा दिवस विद्यार्थ्यांअभावी शाळा भरली होती. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी एकत्रित दंड थोपटले होते. अखेर ग्रामस्थांच्या आक्रमकतेनंतर कोसळलेल्या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी अन्य कामासाठी दहा लाख रुपयांच्या निधीची तरतूद जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केली होती.
यानंतर वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसह रंगरंगोटीचे कामदेखील पूर्ण करण्यात आले आहे; मात्र अजूनही नव्या वर्गखोल्यांमध्ये वर्गच भरले जात नसल्याने पालकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नव्या वर्गखोल्यांमध्ये शाळा न भरवण्याचे नेमके कारण तरी काय? आणखीन किती दिवस अंगणवाडीतच विद्याथीं धडे गिरवणार, असा प्रश्न उपस्थित केला जात असून याबाबत लवकरात लवकर कार्यवाहीची मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 04/Feb/2025














