राजापूर : घरपरिसरासह शेतशिवारामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला-सुका वर्गीकरण करून त्यातील सुका कचरा जाळून नष्ट करण्याऐवजी त्यापासून गांडूळ खतनिर्मिती करण्याचे प्रशिक्षण तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीतर्फे महिला बचतगटांना देण्यात आले.
माझी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षणामुळे संकलित होणारा सुका कचरा जाळून नष्ट करण्याऐवजी त्यापासून गांडूळ खतनिर्मिती करत अर्थार्जन करण्याचा निर्धार महिला बचतगटांनी केला. यावेळी घरातील वापरात नसलेल्या साड्या, खताच्या पिशव्या यापासून पर्यावरणपूरक पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. याप्रसंगी सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप, ग्रामपंचायत सदस्य वैशाली चौगुले, जान्हवी माटल, ग्रामपंचायत अधिकारी नेहा कुडाळी, प्रगतिशील शेतकरी दयानंद चौगुले आदींसह बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.
या उपक्रमात गांडूळ खतनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. घरपरिसर आणि शेतशिवारातील सुका कचरा जाळून नष्ट केला जातो. त्या कचऱ्याचा उपयोग करत गांडूळ खतनिर्मिती केल्यास त्याच्यातून स्वतः सह कुटुंबाची आर्थिक उन्नती साधता येते. ही बाब लक्षात घेऊन कृषी साहाय्यक दीपक सोनवणे यांनी गांडूळ खतनिर्मितीचे प्रशिक्षण दिले. गांडूळ खताद्वारे जमिनीची सुपिकता कशी वाढवता येते ते सोनवणे यांनी सांगितले. समर्थ युवा प्रशिक्षण संस्थेमार्फत टाकाऊ असलेल्या कपड्यांच्या साह्याने उपयुक्त कापडी पिशवीनिर्मितीचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वातावरणात होत असलेले बदल, प्लास्टिक बंदीसह बांबू अन् शेवगा लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात महिला बचतगटांना ग्रामपंचायतीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गांडूळ खत बेडचे वाटप करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 04/Feb/2025














