रत्नागिरी : जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी हा दिन साजरा करण्यात आला. जागतिक कर्करोगाची २०२५ ते २०२७ ची थीम युनायटेड बाय युनिक (एकजूट होऊ या.. कर्करोगाला हरवू या) ही आहे. या मोहिमेत तरुणांमध्ये जनजागृतीसह बाधित व संशयित रुग्णांवर विनामूल्य उपचार दिले जाणार आहेत.
देशात असंसर्गजन्य आजारांची झपाट्याने वाढ होत असून, जवळपास ६३ टक्के मृत्यू हे या रोगांमुळे होतात. त्यापैकी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ९ टक्के इतके आहे. राज्यात मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय कर्करोग, हे तीन कर्करोग आहेत. शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील ३० वर्षांवरील लोकांचे मौखीक, स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी केली जाणार आहे. सर्व जिल्हा रुग्णालयासह जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी मनपा यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जाणार आहे.
दि. ४ फेब्रुवारी रोजी राजस्तरीय अभियानाचा जिल्ह्यातही प्रारंभ झाला आहे. ४ ते ८ फेब्रुवारी कालावधीत आतापर्यंत निदान झालेल्या सर्व कर्करोग रुग्णांना आवश्यक तो उपचार विनामूल्य मिळण्यासाठी स्थानिक व जिल्हा पातळीवर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शहरी आरोग्य केंद्रात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम अंतर्गत संशयित रुग्णांची शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत आढळलेल्या रुग्णांना कर्करोग उपचार केंद्रावर पाठविण्यात येवून विनामुल्य उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनांबाबतही सेवा दिली जाणार आहे.
कर्करोगांच्या रुग्णांसाठी आधाराची फार गरज असते. कर्करोगाच्या उपचारातून जाणे हा एक कठीण प्रवास आहे. त्यांना योग्य तो पाठिंबा द्या. त्यांना धीर देणे हे सर्वोत्तम काम आहे –डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 05/Feb/2025














