रत्नागिरी : पतितपावन मंदिर परिसरात वस्तूसंग्रहालयाची उभारणी – आमदार किरण सामंत

रत्नागिरी : शहरातील लक्ष्मीचौकनजीक दानशूर भक्तीभूषण भागोजीशेठ कीर यांनी जागा खरेदी करून स्वखर्चाने पतितपावन मंदिर उभे केले. पतितपावन मंदिराला आता २०३१ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. हे मंदिर म्हणजे भारतातील सामाजिक क्रांतीची गंगोत्री म्हणावे लागेल. त्यामुळेच देशभरातून हजारो भाविक येथे येत असतात. या परिसरात स्वा. सावरकर यांच्या संबंधित वस्तूसंग्रहालय उभारणी करण्यात येणार असल्याचा मनोदय आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला आहे.

आमदार सामंत यांनी अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ आयोजित माघी गणेशोत्सवानिमित्त श्री पतितपावन मंदिराला सदिच्छा भेट दिली. ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली प्राथमिक भूमिका आहे. त्या अनुषंगाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या सामाजिक समरसतेच्या पुण्याईने पावन झालेल्या श्री पतितपावन मंदिराची पुन्हा उभारणी व परिसराच्या सुशोभीकरणाचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. आमदार सामंत यांनी भेटीत मंदिर परिसर सुशोभीकरण आणि मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या मंदिर परिसरात स्वा. सावरकर यांच्या जाज्वल्य इतिहासाचे अर्थात जीवनपटाचे म्युरल उभारण्यात येणार आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांनी जातीनिशी लक्ष घालण्याच्या सूचना आमदार सामंत यांनी या वेळी दिल्या.

या वेळी पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मंदार खेडेकर, सचिव तुषार खंडकर, विश्वस्त उमेश खंडकर, नितीन गुरव, विजय मुळ्ये, अमोद देसाई, मंदार खंडकर, संदीप रसाळ, मनोज जोशी, सचिन कोतवडेकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 05/Feb/2025