रत्नागिरी : नवनिर्माण कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे ८, ९ फेब्रुवारी रोजी ‘तंदुरी नाइट्स’चे आयोजन

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही “तंदुरी नाईट्स” या खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आणि हा खाद्य महोत्सव शनिवारी (ता. ८) आणि रविवारी (ता. ९) रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वेळेत नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या कै. मोहन खातू क्रीडा संकुल, एमआयडीसी मिरजोळे येथे रंगणार आहे. यामध्ये अनोख्या आणि विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची चव रत्नागिरीकरांना चाखता येणार आहे.

खाद्य महोत्सवाची दीर्घ परंपरा लाभलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय स्तरावरील विशेष नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून, यावेळी एस. पी. हेगशेट्ये हॉस्पिटॅलिटी स्टडीजचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आणि इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया या परदेशात तसेच गोवा, मुंबई, अहमदाबाद येथे यशस्वीरीत्या कार्यरत असलेल्या हॉटेल मॅनेजमेंटमधील माजी विद्यार्थ्यांची ही यावेळी विषेश उपस्थिती लाभणार आहे.

हे या इव्हेंटचे १२ वे वर्ष आहे. नवनिर्माण कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने दरवर्षी थीम डिनरचे आयोजन केले जाते. यामध्ये आजपर्यंत महाराष्ट्रीयन, गुजराती, राजस्थानी, हैदराबादी आदी वेगवेगळ्या थीमवर डिनर आयोजित केला आहे. या सर्व थीम डिनरना रत्नागिरीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. दोन दिवस चालणारा हा खाद्य महोत्सव आणखी दोन दिवस सुरू रहावा, अशी विनंती वजा मागणी ही रत्नागिरीकरांकडून वेळोवेळी करण्यात आली आहे.

यंदाही अशाच प्रकारच्या “तंदुरी नाईट्स” या टीम डिनरचे आयोजन केले आहे. यामध्ये रत्नागिरीकरांसाठी द सॅंडविच स्टेशन, मोमो एक्सप्रेस, होम ऑफ बिर्याणी, चिप्स अँड चॅट, कॉम्बो ट्रीट, स्पार्कलिंग स्प्रित्ज स्टेशन, तंदुरी खजाना, चिली ब्लिस अशा अनोख्या आणि विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय खाद्य पदार्थांची रेलचेल या खाद्य महोत्सवात असणार आहे.

हा महोत्सव शनिवार आणि रविवार असा दोन दिवस चालणार असून त्यासाठी मर्यादित जागांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर येते तिकीट खरेदी करून आपली जागा निश्चित करावी आणि चोखंदळ खवय्ये असलेल्या रत्नागिरीकरांनी या खाद्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये आणि हॉटेल मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. ताराचंद ढोबाळे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:58 05-02-2025