चिपळूणात ओले काजूगर १ हजार ४०० रु किलो

चिपळूण : चिपळूण तालुक्यात काजू हंगामाला सुरुवात झाली आहे. काजू बीच्या दरासोबत आता ओल्या काजुगरालाही चांगला दर मिळत आहे. ओल्या काजूगराला प्रतिकिलो १ हजार ४०० तर कच्च्या बी ला शेकडा दोनशे रुपये दर मिळत आहे. त्यामुळे बागायतदार आनंदी आहेत. चिपळूण शहरातील पेट्रोलपंपावरही आता काजू बिया उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

काजू हंगाम यावर्षी दीड महिन्यांनी सुरू झाला. अजूनही काही भागांतच काजू बी परिपक्व व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या काजू उत्पादक ओल्या काजू आणि काजूगर विक्री करत आहेत. ओला काजूगर प्रतिकिलो १ हजार ४०० रुपये तर शेकडा ३५० रुपयांनी विक्री करत आहेत.

चिपळूण शहरातील काही पेट्रोलपंप चालक काजू बियांची विक्री करत आहेत. बाहेरगावातून येणारे पर्यटक इंघन भरण्यासाठी पेट्रोलपंपावर जातात. त्यांना सहज काजू बी उपलब्ध होणेसाठी पेट्रोल पंपचालक काजू बियांची विक्री करतात. शहरातील हॉटेल आणि जनरल स्टोअरमध्ये काजू बिया विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शहरातील पानगलीमध्ये भाजीविक्रेते काजू बियांची विक्री करतात. ओल्या काजुगराला मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसह स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. ओला काजू बी फोडण्यासाठी महिलांना शेकडा ५० रुपये दिले जातात. काजू बियांना चांगला दर मिळत असल्यामुळे विक्रेतेही आनंदी आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 06/Feb/2025