रत्नागिरी : या वर्षी माहेर संस्थेचा २८ वा वर्धापन दिन माहेर वात्सल्यधाम, आवळवाडी, पुणे येथे नुकताच पार पडला. २८ व्या वर्धापन दिनानिमित्त माहेर संस्था अंतर्गत उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता म्हणून माहेर संस्था रत्नागिरीचे प्रकल्प प्रमुख, अधीक्षक व सामाजिक कार्यकर्ते, सुनील कांबळे यांचा गौरव शाल, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन, श्री. बापूसाहेब पठारे आमदार वडगाव शेरी, पुणे व माहेर संस्थेच्या संस्थापिका, संचालिका सि. लुसी कुरियन दीदी, बाल कल्याण समिती पुणे सदस्य, आनंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
माहेर संस्था गेली २८ वर्षे महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात व महाराष्ट्राच्या बाहेर सात राज्यात सामाजिक काम करीत आहे. संस्थेच्या एकूण ६८ शाखा देशभरात आहेत. सर्व शाखांमध्ये अनाथ, निराधार दुर्लक्षित, वंचित मुले – मुली, निराधार, महिला व पुरुष दाखल होत असतात त्यांचा सांभाळ देखभाल व पुनर्वसनाचे काम माहेर संस्था करीत आहे. संस्थेत एकूण ५५० कर्मचारी कार्यरत आहेत. सुनील कांबळे रत्नागिरीत माहेर संस्थेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे अखंड व सातत्याने सामाजिक काम करीत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नाने व उत्स्फूर्त कामाने माहेर संस्थेचे नाव रत्नागिरी जिल्ह्यात सर्व दूर पोहोचले आहे. त्यांच्या कामाची ही पोचपावती म्हणून हा पुरस्कार खूप महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे. या पुरस्काराने जीवात जीव असेपर्यंत निरंतर माहेरचे काम करण्याची उर्मी आणि प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. हा पुरस्कार मिळाल्याने समाजातील सर्व स्तरातून सुनील कांबळे यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 06-02-2025













