चिपळूण : चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानावर सिझनचे प्रथम दर्जा व रणजी क्रिकेटचे सामने खेळविले जातील, अशाप्रकारची टर्फ विकेट तयार करण्यात आली आहे. बुधवारी (दि. ५) या टर्फ विकेटची चाचणी घेण्यासाठी सराव सामना घेण्यात आला. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी श्रीफळ वाढवून या टर्फ विकेटचा प्रारंभ केला.
पवन तलाव मैदानावर टर्फविकेट व्हावी हे अनेक क्रिकेट खेळाडुंचे स्वप्न होते. आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून ते आता सत्यात उतरले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे सिझनचे सामने व्हावेत, अशी मागणी होती. याआधी या ठिकाणी अशा स्पर्धा झाल्या होत्या. मात्र, त्या मॅटवर खेळविल्या गेल्या. आ. निकम यांनी पवन तलाव मैदान विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर व सहकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून आता या मैदानावर तीन दर्जेदार टर्फ विकेट तयार करण्यात आल्या आहेत.
यातील एक टर्फ विकेट क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज असून सराव सामना देखील सुरू झाला आहे. गुरुवारपासून चिपळूण बाहेरील खेळाडू या विकेटवर सराव करणार आहेत. ही टर्फ विकेट कशी बनविली, त्याचे आऊटफिल्ड कसे आहे, त्याचा अंदाज खेळाडू घेणार आहेत. दरम्यान, या शुभारंभावेळी ज्येष्ठ क्रिकेटपटू विजय व्यवहारे, समालोचक सचिन कुलकर्णी, इब्राहीम सरगुरोह, प्रशांत कदम, प्रशिक्षक उदय काणेकर, पत्रकार योगेश बांडागळे, अथर्व चिले आदी उपस्थित होते. लवकरच राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा येथे रंगणार आहे. याचवेळी टर्फ विकेटचा आ. शेखर निकम यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
रणजी क्रिकेट खेळविणार : दाभोळकर
पूर्वी येथे सिझन बॉल खेळले जायचे. मात्र, मध्यंतरी त्यात खंड पडला. माजी आ. बापू खेडेकर यांनी सिझन बॉल क्रिकेटला वेगळी ओळख मिळवून दिली. या ठिकाणी एकनाथ सोलकर, जुल्फी परकार, गुलाम परकार, लतीफ परकार, रॉबिन, चंद्रकांत पंडीत असे अनेक खेळाडू घडले. मात्र, अनेक वर्षे येथील सिझन बॉल क्रिकेट बंद झाले होते. भविष्यात या मैदानावर रणजी क्रिकेट खेळविले जाईल, असा विश्वास क्रिकेट असो. चे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 06/Feb/2025












