रत्नागिरी : रत्नागिरीतील एका कंपनीच्या जेटीजवळ सुरक्षितस्थळी नांगर टाकून मासेमारी नौका उभ्या करण्यास जेटीवरच्या सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केला. त्यामुळे या नौकाना धोका पत्करून त्यांच्या गावाजवळच्या जेटीपर्यंत जाणे भाग पडले. समुद्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या नौका आपापल्या जेटीवर परतल्या आहेत. धोका ओळखून रत्नागिरीतील बहुसंख्य नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्याच नाहीत.
गेल्या आठवड्यापासून उत्तरेकडील जोरदार वारे समुद्रात वाहत असल्याने मासेमारी करणे धोकादायक झाले आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या अनेक मच्छिमार नौकाना जोरदार वाऱ्याचा धोका निर्माण झाल्याने त्या किनाऱ्याकडे परतू लागल्या. रत्नागिरीतील एका कंपनीच्या जेटीजवळ समुद्रात राजीवडा, कर्ला, मिरकरवाडा, मिऱ्या येथील नौका आल्या असता तेथेच नांगर टाकून उभ्या करण्यात आल्या होत्या. कंपनीच्या जेटीवर मालवाह जहाजे येत जात असल्याने या जहाजांच्या चॅनलमध्ये मच्छिमार नौका उभ्या राहिल्याने जहाजांनाच अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे जेटीवरील सुरक्षारक्षकांनी तेथील उभ्या नौकाना हटकले. त्यामुळे या मच्छिमार नौकाना वाऱ्याचा धोका पत्करून तेथून नौका हलवून गावातील जेटींवर आणून उभ्या कराव्या लागल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 07/Feb/2025














