दापोलीत पाण्याच्या टाकीजवळ महाकाय झाड कोसळले; वीजखांब आणि एसटी शेडचे मोठे नुकसान

झाड कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा रात्रभर खंडित; दापोली नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करून वाहतूक सुरळीत

दापोली: दापोलीतील पाण्याच्या टाकीजवळ झाड कोसळले असून, गुरुवारी रात्री १० ते १०:३० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे दापोली-खेड महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. पाण्याच्या टाकीजवळ असलेले भलेमोठे आंब्याचे तसेच वडाचे झाड अचानक महामार्गावर उन्मळून पडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सुरक्षेच्या दृष्टीने हा रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला होता.

झाड महामार्गावर कोसळल्यामुळे महावितरणच्या मुख्य विद्युत वाहिन्यांचे खांब तुटून खाली पडले. परिणामी, संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा रात्रभर पूर्णपणे खंडित झाला होता. यामुळे स्थानिक नागरिकांचे आणि रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. याशिवाय रस्त्यालगत असलेल्या एसटी बसथांब्याच्या शेडवरही झाडाच्या मोठ्या फांद्या पडल्याने शेडचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच संबंधित आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शुक्रवारी सकाळपासून दापोली नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेले झाड कापून हटवण्याचे आणि परिसर साफसफाई करण्याचे काम युद्धापातळीवर हाती घेतले. रस्ता पूर्णपणे मोकळा केल्यानंतर दापोली-खेड महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत व सुरळीत सुरू झाली असून नागरिकांनी आणि वाहनधारकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 01-08-2026