चिपळूण : शहरात गॅसची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे. शहरातील रस्ते खड्डेमुक्त होत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाने खड्डे भरण्यास सुरवात केल्यानंतर नागरिक पालिका कामगारांना सूचना करून आपल्याला हवे त्याप्रमाणे खड्डे भरून घेत आहेत.
चिपळूण शहरात अशोका गॅस कंपनीचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. शहरातील रस्ते खोदून तसेच काही ठिकाणी रस्त्यालगतचा भाग खोदून पाईपलाईन टाकली जात आहे. पाईप टाकल्यानंतर कंपनीचे कामगार खोदलेले खड्डे दगडमातीने बुजवत आहेत. हे खड्डे केवळ दगडमाती टाकून ढोबळमानाने बुजवण्यात आले. या मातीवरून वाहने गेल्यावर अनेक ठिकाणी माती दबुन पुन्हा खड्डे दिसून येत आहेत. या मातीवर पाणी पडल्यानंतर माती दबत आहे. त्यामुळे खोल खड्डे दिसत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना धुळीचा त्रास होत आहे. रस्ते वर-खाली असल्याने वाहने घसरून लहान-मोठे अपघात होत आहेत. मोठा अपघात होऊ नये म्हणून पालिकेने खबरदारी घेत तत्काळ खड्डे भरण्यास सुरवात केली.
पालिकेच्या बांधकाम विभागाने खात्यांतर्गत खड्डे भरण्याचे काम सुरू केले. गुरूवारी सकाळी मार्कंडी भागातील खड्डे भरण्याचे काम सुरू होते तेव्हा नागरिकांनी कामाच्या ठिकाणी हजेरी लावून आपल्याला हवे त्या प्रमाणे खड्डे भरून घेतले. खड्डे भरताना पालिकेने प्रथम रोड क्रॉसिंगचे खड्डे भरण्यास सुरवात केली आहे. ज्या ठिकाणी पूर्ण रस्ता खराब झाला आहे त्या ठिकाणी पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे नगर अभियंता दीपक निंबाळकर यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 07/Feb/2025














