मंडणगड : नवयुवक तरुण मंडळ मंडणगड, यांच्यावतीने माघी गणेशोत्सवानिमित्त किल्ले मंडणगड येथील गणेश मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गणेश जन्मोत्सव, सत्यनारायण महापूजा, कीर्तन, भाविकांसाठी खिचडीचा महाप्रसाद या कार्यक्रमांना सालबादप्रमाणे भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यंदा श्रीगणेश मंदिराचा जीर्णोद्धारासाठी मंदिराचे नव्याने बांधकाम सुरु असल्याने श्रीगणेशाची मूर्ती आणून मंडपात प्रतिष्ठापना करण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीगणेशाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. तालुक्यातील अनेक गावांतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली. किल्ले मंडणगड येथील गणपती नवसाला पावतो असा लौकीक असल्याने माघीला नवस फेडण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. यादिवशी किल्ल्यावर जत्रेचे स्वरूप पहायला मिळते. विविध प्रकारची दुकाने असतात.
बालगोपाळांसह सर्वच वयोगटातील भाविक किल्ल्यावर यादिवशी येत असतात. दरवर्षीप्रमाणे किल्ल्यावर अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष समीर लेंढे, उपाध्यक्ष राहुल कोकाटे, श्रीकांत लेंढे, सौरभ लेंढे, विजय लेंढे, काशीनाथ बैकर यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली वैभव कोकाटे, दिनेश लेंडे, बाळू कामेरीकर, संकेत जाधव, श्रीपाद कोकाटे, राजू पटेल, जयेश नगरकर, कौस्तुभ भिगार्डे, पराग लेंढे, उमेश पंदीरकर, शशी पटेल, दिनेश पटेल यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 07/Feb/2025














