ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन, पठणातून संशोधन आवश्यक : पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी : आधुनिक काळातील ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन, पठणातून काही उपाययोजना करता येते का याचे संशोधन व्हायला हवे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

उज्जैन येथील महर्षी सान्दीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान आणि रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रातर्फे तीन दिवसांचे क्षेत्रीय वैदिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. येथील माधवराव मुळ्ये भवनात या संमेलनाचे उद्घाटन झाले.‌ त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्कृत ही भारताची पुरातन भाषा आहे. तिचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण या भाषेचा उपयोग पोथ्या आणि पुराणांमध्ये राहिला आहे. त्यापलीकडे जाऊन आधुनिक काळातील प्रश्न सोडविण्यासाठी या भाषेचा आणि त्यातील वाङ्मयाचा उपयोग होतो का, याचाही अभ्यास केला पाहिजे, असे कुलकर्णी म्हणाले.

पुणे विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख गणेश थिटे यांनी चाळीस वर्षांपूर्वी १९८५ साली पुण्यात झालेल्या पहिल्या वैदिक संमेलनाची माहिती दिली. हरिद्वार येथे अलीकडेच झालेल्या एका संमेलनात सैन्यातील निवृत्त अधिकारी असलेल्या उत्तराखंडच्या राज्यपालांनी सैन्यात असताना सैनिकांना वेदांपासून कशी स्फूर्ती मिळते, हे सांगितल्याची आठवण थिटे यांनी सांगितली.

कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, संस्कृत हा भारताचा आत्मा आहे, तर वेद हा संस्कृतचा आत्मा आहे. त्यामुळेच जगभरात कोठेही लिखित स्वरूपात पुरातन संस्कृत साहित्य असेल तर ते जतन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरविले आहे. जगभरातील सर्व संप्रदायांचे मूळ वेदात आहे. मात्र वेदांचे अर्थासह पठण करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

Tata SUV

रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक दिनकर मराठे यांनी प्रास्ताविक केले.

उद्घाटन समारंभानंतर माधवराव मुळ्ये भवन, रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे राणी लक्ष्मीबाई सभागृह, वेदपाठशाळा आणि गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधील ऋचांचे पारायण करण्यात आले.

संमेलनाला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून सुमारे १०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 07-02-2025