रत्नागिरी : गेले सात दिवस गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या रत्नागिरीच्या महागणपतीचे शुक्रवारी वाजत गाजत जल्लोषात रत्नागिरीतील मांडवी येथे विसर्जन करण्यात आलं. यावेळी भाविक मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले होते.
माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेने आणि कुडाळ मालवणचे आ. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाने यंदा प्रथमच रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाने माघी गणेशोत्सवाच्या आयोजन केले होते. सात दिवस हा गणेशोत्सव आरोग्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. पेण येथून सुबक आणि अतिशय विलोभनीय रत्नागिरीच्या महागणपतीची मूर्ती आणण्यात आली होती. विधिवत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भजन, हरिपाठ, भक्ती संगीताचा कार्यक्रम, महा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. तर महा प्रसदाचाही लाभ भाविकांनी घेतला. मोठ्या संख्येने नागरिकांनी या महागणपतीचे दर्शन घेतले.
खा. नारायण राणे, सौ. नीलमताई राणे, आ. निलेश राणे यांनीही या महागणपतीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते चार होतकरू विद्यार्थिनींना सायकलींचे मंडळातर्फे वाटप करण्यात आले.
शुक्रवारी संध्याकाळी आरोग्य मंदिर येथून श्री महागणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली. यावेळी रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, राणे समर्थक, रत्नागिरीतल्या भाविक मोठ्या संख्येने सामील झाले होते. ढोल पथक आणि डीजेच्या तालावर भाविकांनी बाप्पाची जल्लोषात मिरवणूक काढली. रात्री मांडवी समुद्रकिनारी बाप्पाला साश्रू नयनानी निरोप देण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 08-02-2025














