रत्नागिरी शहरात प्रचंड वाहतुक कोंडी

रत्नागिरी : रत्नागिरीत सुरू असलेले मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच माघी गणेशोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकांमुळे वळवलेली वाहतूक यामुळे शुक्रवारी वाहतूक कोंडीचा वाहनधारक तसेच नागरिकांना सामना करावा लागला.

गेल्या काही दिवसांपासून शहरात आठवडा बाजारापासून माळ नाक्याच्या दिशेने मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. काम सुरू असलेल्या माळ नाका भागात दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच मार्गिकेवरून वळवण्यात आल्यामुळे गेले मागील काही दिवस सकाळ तसेच संध्याकाळी कार्यालय तसेच शाळा सुटण्याच्या वेळेत वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका अनेकांना सहन करावा लागत आहे.

शुक्रवारी सायंकाळी माघी गणेशोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकांमुळे माळ नाक्यापासून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांनी शहरातील अन्य मार्गांवरून जाणे पसंत केले. मात्र ते रस्ते अरुंद असल्याने प्रत्येक रस्त्यावर किमान तासभर वाहतुकीची कोंडी झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 08-02-2025

Tata sierra