गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कायदा आणि अधिकारविषयक प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे आयोजन

रत्नागिरी : र. ए. सोसायटीच्या गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत राज्यशास्त्र विभागाच्या वतीने नागरिक, कायदा आणि अधिकार या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून महाविद्यालयांची सर्वांगीण प्रगती आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जातात. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदानित महाविद्यालयांना सक्षमीकरणासाठी विशेष अनुदान दिले जाते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला हे अनुदान प्राप्त झाले असून, या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी काही प्रमाणपत्र, कौशल्य विकसन आणि व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन आहे.

राज्यशास्त्र विभागाच्या वतीने येत्या दि. १० फेब्रुवारी ते दि. १ मार्च २०२५ या कालावधीत नागरिक, कायदा आणि अधिकार हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्ग घेण्यात येणार असून, अभ्यासवर्गात नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कायदेशीर बाबींवर विविध तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीद्वारे विविध आस्थापनांचे प्रत्यक्ष कामकाज दाखविण्यात येणार आहे. दुपारी २.३० ते संध्याकाळी ४.०० या वेळेत हा अभ्यासवर्ग महाविद्यालयात घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी या अभ्यासवर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. नीलेश पाटील, राज्यशास्त्र विभाग (संपर्क : ९८९२४००१९२) यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 08-02-2025

Shanti 3