रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेत मक्त्यावर काम करणाऱ्या सर्व लिपिकांना कार्यालयीन वेळेतच काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नगर परिषदेत स्थायी लिपिकांची संख्या फारच कमी आहे. अशावेळी कार्यालयात येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मक्त्यावरील कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रीक मशीनचा वापर केला जाणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेने स्थायी किंवा कायम स्वरुपाचे अनेक लिपिक निवृत्त झाले आहेत. सध्या केवळ सात ते आठच लिपिक कार्यरत आहेत. त्याचवेळी नगर परिषदेच्या विविध विभागात मक्त्यावरील लिपिकांची सेवा घेतली जात आहे. शुक्रवारपर्यंत या मक्त्यावरील किंवा ठेक्यावरील लिपिक कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक नव्हती.
रनपमध्ये कायमस्वरुपी स्टाफ कमी असल्याने बहुतांश काम मक्त्यावरील कर्मचारी वर्गच सांभाळत आहे. परंतु काही लिपिक कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर नसल्याच्या तक्रारी मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे आल्या. या पार्श्वभूमीवर मक्त्यावरील ४० लिपिक कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रीक मशीनद्वारेच घेण्याचे निश्चित झाले. रनपमध्ये या मक्त्यावरील लिपिकांची हजेरी घेणारे नवीन बायोमेट्रीक मशीन बसवण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वा. पर्यंत सेवा द्यावी लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 08/Feb/2025














